मुंबई - रुग्ण कोरोनाबाधित आहे का, हे तपासण्यासाठी त्या रुग्णाचे स्वॅब घेतले जातात. परंतु पालिका आरोग्य विभागाने एक पाऊल पुढे टाकत आता छातीचा एक्स-रे तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ७ झोनमध्ये ७ मोबाईल व्हॅनद्वारे संशयितांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
आता छातीच्या 'एक्स-रे'वरूनही होणार कोरोनाचे निदान, मोबाईल व्हॅनद्वारे संशयितांचा घेणार शोध - chest x-ray for corona
मुंबई पालिका आरोग्य विभागाकडून, छातीच्या एक्स-रे वरुन कोरोनाची लागण झाली की नाही हे तपासले जाणार आहे. यासाठी पालिकेने झोनमध्ये ७ मोबाईल व्हॅन तयार केले आहेत.
मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. तरीही अधिकाधिक लोकांची जलद चाचणी करता यावी, यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. संशयीत रुग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर त्याच्या अहवालानुसार त्या संशयितावर उपचार केले जातात. आता चाचण्या करण्याची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच कोरोना संशयीत रुग्णांचा शोध घेण्यासाठी आता मुंबईत फिरत्या मोबाईल व्हॅन पुढील दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार आहेत.
या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून संशयिताच्या छातीचा एक्स-रे केला जाणार आहे. त्यानंतर तो एक्स-रे तंज्ञ डाॅक्टरांना पाठवण्यात येणार आहे. एक्स-रेचे निरीक्षण केल्यानंतर डाॅक्टरांकडून अहवाल प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच्यावर योग्य उपचार करण्यासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर निदान न होणाऱ्या व्यक्तीला घरी सोडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत ७ झोन असून प्रत्येक झोनमध्ये मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या झोनमधील उपायुक्त अथवा सहायक आयुक्त ठरवतील की मोबाईल व्हॅनचा कुठे वापर करायचा. सध्या पालिकेकडे ३ मोबाईल व्हॅन तयार असून आणखी चार मोबाईल व्हॅन एक-दोन दिवसांत उपलब्ध होतील, असेही काकाणी यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. संशयितांचा शोध घेणे, हाच उद्देश असल्याने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. एक्स-रे द्वारे संशयितांची तपासणी करण्याचे हे नवीन तंत्रज्ञान पालिका प्रशासनाकडून उपयोगात आणले जात आहे.