मुंबई :27 फेब्रुवारी रोजी गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर राहण्याचे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात या सर्व आरोपींना विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
27 फेब्रुवारीला आरोप निश्चिती होणार :मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने जुलै महिन्यामध्ये अटक केली होती. संजय राऊत यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या प्रकरणातील सर्व पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी गैरहजर असल्याने आज आरोप निश्चिती करण्यात आली नाही आहे. आता या प्रकरणात 27 फेब्रुवारी रोजी आरोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. या प्रकरणात 100 दिवसाच्या नंतर संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामीन मिळाला होता.
हे आहेत आरोपी :गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्यासह एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये राकेश कुमार वाधवान, राकेश वाधवान यांचा मुलगा सारंगकुमार वाधवान, शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी केवळ प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोघांना अटक केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टातील न्यायाधीश राहुल रोकडे त्यांच्यासमोर यास पाचही आरोपींवर या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात येणार होते.
न्यायालयाने ईडीची मागणी नाकारली :शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने विरोधात गंभीर निरीक्षण नोंदवत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. संजय राऊत यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात यावा याकरिता ईडीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. तसेच या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी देखील ईडीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ईडीची मागणी नाकारली होती. तसेच या प्रकरणावर रीतसर सुनावणी घेण्यात येईल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
काय आहे घटनाक्रम :ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीने छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. यानंतर ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्य रात्री अटक केली. यानंतर राऊतांना पीएमएलए न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. यानंतर गेल्या तीन महिन्यापासून राऊत हे तुरुंगात आहे. या तीन महिन्यात अनेक वेळा राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, नेहमी राऊतांच्या न्यायालयीन कोठीडीत वाढ करण्यात आली.