मुंबई- गतवर्षी आरेतील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली. डिसेंबरमध्ये या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण, ही घोषणा अद्याप कागदावरच असल्याने आज 'सेव्ह आरे'च्या शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी पुढील १० दिवसांत गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळातील अमृता भट्टाचार्य यांनी दिली.
आरे कारशेडला पर्यावरणप्रेमी - आदिवासींचा विरोध आहे. मात्र, या विरोधाला डावलून तत्कालीन फडणवीस सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हे काम पुढे रेटून नेले. त्यामुळे, सेव्ह आरे विरुद्ध राज्य सरकार-एमएमआरसी असा संघर्ष वाढला. ४ ऑक्टोबर २०१९च्या रात्री एमएमआरसीने आरेतील झाडे बेकायदेशीररित्या कापण्यास सुरवात केली. याची माहिती मिळताच सेव्ह आरे चळवळीतील कार्यकर्त्यांनी आरेत धाव घेतली आणि एमएमआरसी-सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. हे आंदोलन दडपत पोलिसांनी २९ जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, आदिवासी यांचा समावेश आहे.