महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Patra Chawl Scam Case Update : गोरेगाव पत्राचाळ प्रकरण; संजय राऊत यांच्यासह इतर आरोपींविरोधात 'या' दिवशी होणार दोषारोप निश्चित

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्या विरोधात ईडीकडून दोषारोपत्र दाखल केले जाणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना 24 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज दिले आहेत.

By

Published : Jan 21, 2023, 5:11 PM IST

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : राज्यात गाजलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप असलेले संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत व वाधवान ब्रदर्स यांच्याविरोधात ईडीकडून 24 जानेवारी रोजी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात या सर्व आरोपींविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.


24 जानेवारी आरोपपत्र निश्चित : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने जुलै महिन्यामध्ये अटक केली होती. संजय राऊत यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात या प्रकरणातील सर्व पाच ही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र, या प्रकरणातील तीन आरोपी गैरहजर असल्याने आज आरोप निश्चिती करण्यात आली नाही आहे. आता या प्रकरणात 24 जानेवारी रोजी आरोपपत्र निश्चित करण्यात येणार आहे. या प्रकरणात 100 दिवसाच्यानंतर संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामीन मिळाला होता.

प्रकरणात पाच आरोपींवर गुन्हा दाखल : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्यासह एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये राकेश कुमार वाधवान, राकेश वाधवान यांचा मुलगा सारंगकुमार वाधवान, शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी केवळ प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोघांना अटक केली होती. आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टातील न्यायाधीश राहुल रोकडे त्यांच्यासमोर यास पाचही आरोपींवर या प्रकरणात आरोप निश्चित करण्यात येणार होते.

संजय राऊत जामीनावर : संजय राऊत यांना जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने विरोधात याप्रकरणी निरीक्षण नोंदवत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. संजय राऊत यांना देण्यात आलेल्या जामीन रद्द करण्यात यावा याकरिता ईडीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. तसेच या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी देखील ईडीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ईडीची मागणी नाकारली होती, तसेच या प्रकरणावर रीतसर सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

100 दिवसानंतर जामीन : ईडीने राऊतांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी 31 जुलै रोजी सकाळी ईडीन छापा टाकला. यानंतर राऊतांनी 9 तासांची चौकशी केल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात केली. ईडी कार्यालयात देखील राऊतांची 7 तासांची चौकशी केल्यानंतर ईडीने 31 जुलै रोजी मध्यरात्री अटक केली. राऊतांना पीएमएलए न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर राऊतांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यापासून राऊत हे तुरुंगात होते. या तीन महिन्यात अनेक वेळा राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. परंतु, नेहमी राऊतांच्या न्यायालयीन कोठीड वाढ करण्यात आली होती. तब्बल 100 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला.


पत्राचाळ प्रकरण नेमके काय? : पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्राचाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचे आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला.

रहिवासी अजूनही प्रतिक्षेत :पत्राचाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल. तसेच म्हाडासाठी घरे बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारले नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.

यामुळे आले प्रकरण समोर : जीएपीसीएलकडून भाडे भरले जात नसल्याची तसेच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचे भाडे भरेल, असे करारात नमूद करण्यात आले होते. पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडे भरले. याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडे न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचे कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली. पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यामुळे प्रोजेक्ट ठप्प झाले होते.

महाविकास आघाडीच्या काळात कामांना सुरूवात : महाराष्ट्र सरकारने 2020 साली निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी स्थापन केली. ही कमिटी पत्रा चाळीच्या भाडेकरूंचे पुनर्वसन कसे करायचे आणि घराची भाडी कशी द्यायची, याबाबत सल्ला देणार होती. जून 2021 साली राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आणि जुलै 2021 साली सरकारने याबाबतचा ठराव मांडला. फेब्रुवारी 2022 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पत्रा चाळीचे ठप्प पडलेले बांधकाम पुन्हा एकदा सुरू झाले.

हेही वाचा :MLA Bachu Kadu Case : आमदार बच्चू कडूंना सत्र न्यायालयाचा दिलासा ; 15 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी तहकुब

ABOUT THE AUTHOR

...view details