मुंबई - कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ व त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. मात्र, यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी विद्यापीठ प्रशासनाने नीट नियोजन न केल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे.
मुंबई विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात इंटरनेटची सोय उपलब्ध नाही. तर, दुसरीकडे डेटापॅक संदर्भातही असंख्य विद्यार्थ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. याविषयी महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तक्रार करूनही विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 'एमफुक्टो' या प्राध्यापकांच्या संघटनेने या विरोधात मोहीम सुरू करून विद्यापीठ प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक काढून प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांच्या तीन ते पाच तासिका घेण्याबाबत अट लावली होती. त्यावर काल सिनेट बैठकीत गदारोळ झाल्यानंतर ही अट शिथिल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, याविषयी अंमलबजावणी महाविद्यालये करतील की, नाही याबद्दलची मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहिचडे यांनी सांशकता व्यक्त केली.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या 830 पेक्षा अधिक वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट व इतर सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातच प्रत्येक दिवशी तीन ते पाच तासिका घेण्याची अट लावल्याने विद्यार्थी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली विविध महाविद्यालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याविषयी उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी विद्यापीठांना पत्र लिहून आकारण्यात येत असलेल्या शुल्कांचा तपशील मागवण्याचे आदेश दिले आहेत.