मुंबई-टीआरपी घोटाळ्यामध्ये मुंबई पोलिसांनी चौकशी आणि तपासाचा वेग वाढवल्याने संशयित आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण येत आहेत. अभिषेक कोलावडे याने रविवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. अटक केलल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून काही वृत्तवाहिन्यांच्या मालक व चालकांनी त्यांचे चॅनेल्स जास्तीत जास्त पाहावेत म्हणून पैसे पुरवत असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीवरून केला आहे.
संशयित आरोपी
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून काही वृत्तवाहिन्यांच्या चालक व मालक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी या चॅनलच्या पदाधिकाऱ्यांना लवकरच समन्स पाठवले जाणार असून यासंदर्भातील पुढील चौकशी केली जाणार आहे. 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेला अभिषेक कोलवडे, दुधनाथ वर्मा, दिनेश कुमार विश्वकर्मा व हरीश पाटील या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यादरम्यान मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. न्यायालयाने या आरोपींना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे टीआरपी घोटाळा ?
पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महामुव्ही, न्यूज नेशन आणि रिपब्लिक टीव्ही अशी पाच वाहिन्यांची नावे समोर आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या वाहिन्या तसेच टीआरपी वाढविण्यासाठी पैसे घेणाऱ्या त्यांच्या साथीदारांनी आर्थिक व्यवहारासाठी बोगस कंपन्या थाटल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आरोपींची संख्या देखील वाढत आहे.