मुंबई: सन २०१४ ते २०१९ सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे व आता उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे २०२४ मध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून देवेंद्र फडवणीस यांना नागपूरमधून लोकसभेची संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सक्षम नेतृत्व केंद्रामध्ये असल्याकारणाने अशा पद्धतीची शक्यता त्यांनी नाकारली आहे. असे जरी असले तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील स्थानासाठी केंद्रीय नेतृत्वही आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागपुरातून उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपाला देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामागे देवेंद्र फडणवीस हे मुख्य केंद्रबिंदू आहेत. १०६ आमदारांचे पाठबळ असतानासुद्धा महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. तरीही देवेंद्र फडवणीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. असे असताना देवेंद्र फडवणीस यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात स्थान देण्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती. २०२४ च्या केंद्रीय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी या हेतूने फडणवीसांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.