चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मुंबई :भाजप प्रदेशाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप १५२ जागा जिंकेल असा दावा केला आहे. भाजप, शिंदे गटातील आमदार आधीच संभ्रमात असताना बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे आणखी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भाजप राज्यात ८० टक्के जागा जिंकणार :शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या एंट्रीने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेवाटप रखडलेले आहे. तर, दुसरीकडे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपच्या ८० टक्के म्हणजे तब्बल १५२ जागा निवडून येतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. बावनकुळे यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणारा शिंदे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला किती जागा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकटा भाजप १५२ जागावर विजयी :याविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज्यात आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. राज्याच्या दृष्टीने आम्ही सर्व गणिते आखली आहेत. त्याप्रमाणे आगामी सर्वच निवडणुकीत राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष असेल. राज्यातील ८० टक्के विधानसभेच्या जागा महायुती जिंकणार असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तर एकटा भाजप १५२ जागावर विजयी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे २०६ पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असे देखील बावनकुळे म्हणाले.
लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील : तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या देशभरात ३५० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळेल, अशी अशाही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. सध्या काँग्रेस पक्षात नाराज लोकांचा मोठा ग्रुप तयार झाला असून त्यांना धीर देण्यासाठी नाना पटोलेंकडून वक्तव्य केली जात आहेत, असा टोला देखील त्यांनी नाना पटोलेंना लगावला आहे.
हेही वाचा -Sushilkumar Shinde On Award : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे मौन; तीन वेळा म्हणाले...