महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मित्र सोबत असता तर बळ मिळाले असते'; चंद्रकांत पाटलांना उपरती

कालपासून राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. काही ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

By

Published : Dec 4, 2020, 12:36 PM IST

मुंबई - 'मित्राला मित्र रहायचा नसेल तर, त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. मात्र, आज मित्र सोबत असता तर नक्कीच बळ मिळाले असते,' अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर दिली. पाटील यांना शिवसेनेच्या मित्रपणावर आज उपरती झाल्याची चर्चा आता रंगत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील

आमचा मित्र शत्रूला जाऊन मिळाला -

भाजपाला आपला बालेकिल्ला असलेला पुणे पदवीधर आणि मागील ५५ वर्षांपासून आपल्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदार संघ गमवावा लागला. मित्र (शिवसेना) नसल्यामुळे नागपूरचा बालेकिल्ला हातातून गमवावा लागला का? असे विचारले असता त्यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मित्राला मित्र रहायचा नसेल तर त्यात दुःख करण्यात काही अर्थ नाही. मित्र नाही म्हणून व्यूहरचना रचना करावी लागते. मात्र, मित्र असता तर नक्कीच बळ मिळाले असते हेही खरे आहे, असे पाटील म्हणाले. आमचा मित्र आमच्याबरोबर नाही. तो विरोधकांना जाऊन मिळाला. मात्र, याच मित्रांच्या दोन खासदारांसाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिवाचे रान केले होते, असे सांगत पाटील यांनी निवडणुकीत आलेल्या अपयशाची सारवासारव केली.

हिम्मत असेल तर एकट्याने लढून दाखवावे -

प्रत्येक पक्षाची एक किमान 'वोट बँक' असते. विधानसभेमध्ये वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळी मते मिळाली होती. ती वेग-वेगळे लढ्यामुळे मिळाली होती. आता झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही वोट बँक एकत्र आल्याने हा निकाल समोर आला. आम्ही एकटे लढत होतो, त्यामुळे जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे, असे म्हणता येत नाही. लोकांनी खुश होऊन मतदान केले असे सुध्दा म्हणता येणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे हे घडले. या लोकांनी हिम्मत असेल तर एकट्याने आमच्यासमोर लढून दाखवावे, असे आव्हान पाटील यांनी महाविकास आघाडीला दिले.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरुच -

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, नागपूर आणि पुण्याचा निकाल हाती आला आहे. त्याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. इतर ठिकाणीही कालपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details