मुंबई- सत्ताधारी शिवसेना भाजपच्या महायुतीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केले असले तरी मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, असे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात १ ऑगस्ट पासून महाजनादेश यात्रा काढणार आहेत. या संदर्भात माहिती देताना पाटील बोलत होते.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेवर जात असतानाच दुसरीकडे शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेदरम्यान शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून पहिले जात आहे. यावर पाटील यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल, असे सांगत सेनेला टोला लगावला.
प्रत्येक पक्ष महत्वाकांक्षी असतो त्याचप्रमाणे भाजपही आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जर निश्चित केला असेल तर त्यात काहीही गैर नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले. गेल्या 5 वर्षात महायुतीच्या सरकारने जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम केले आहे. आता हेच केलेले काम जनतेत मिसळून सांगण्यासाठी मुख्यमंत्रांच्या महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत येत्या 1 ऑगस्टला संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील 'मोझर' येथून या यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.