मुंबई -राम जन्मभूमीच्या संघर्षात अनेक मोठ्या नेत्यांवर कारण नसताना ठपका ठेवला होता. आजच्या निकालानंतर हा ठपका पुसला गेला, याचा आम्हाला आनंद आहे. हा न्यायाचा विजय आहे. भाजपा नेहमीच न्यायालयाचा निर्णयाचा आदर करते. राम जन्मभूमीचा निर्णय आणि आजचा निकाल हे दोन अतिशय महत्वाचे निर्णय आहे. लाखो कारसेवकांच्या मनात शतकानुशतके राग होता, तो व्यक्त केला. त्या उत्स्फूर्त भावनेमध्ये बाबरी पडली. या लाखो लोकांवर खटले दाखल करणार का, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, पवारांचे वैशिष्ट्य आहे की, ते व्होट बँक टिकवण्यासाठी टिप्पणी करतात. त्यांची टिप्पणी कोर्टाचा अवमान ठरू शकेल. तुम्हाला मिळाला तो न्याय आणि आम्हाला मिळाला की अन्याय. ही नीती चुकीची आहे, असे पाटील म्हणाले. ओबीसींना मिळणारे आरक्षण कमी असेल तर, त्यांनी तसं सांगावे. मराठा आरक्षण आंदोलन सरकारला हाताळत येत नाही, म्हणून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शरद पवारांचे अज्ञान आहे, असे म्हणता येणार नाही. पण ते त्यांचा विषय दुसरीकडे ढकलत आहेत. पवारांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये, असेही ते म्हणाले.
तसेच केंद्रात कृषी कायद्याची अमंलबजावणी राज्यात आठवडी बाजाराच्या माध्यमातून आधीच लागू झाली होती. पण या सरकारचे अज्ञान इतके आहे की, यांना चांगला मार्गदर्शक देण्याची गरज आहे. या सगळ्यांच्या नेत्या सोनिया गांधी आहेत. काँग्रेसशासित प्रदेशात हा कायदा लागू करणार नाही, असे त्या म्हणत आहेत. हे किती मोठे अज्ञान आहे. तसे करायचे झाल्यास यांना विधिमंडळात या कायद्याच्या विरोधात कायदा बनवून, मंजूर करून राष्ट्रपतींची सही घ्यावी लागेल. त्यांना हा कायदा लागू करावाच लागेल, असे पाटील यांनी सांगितले.
आजच्या सामनाचा संदर्भ देत ते म्हणाले, संजय राऊत यांची मराठी आणि इंग्रजीची शिकवणी घेतली पाहिजे. त्यांना हरामखोर आणि नॉटी शब्द एकच वाटतात. मात्र, वन फाईन मॉर्निंगचा अर्थ त्यांना कळला नाही. त्याचा अर्थ पहाट नसून अचानक असा होतो, हे त्याना सांगायला हवे. मागच्या सहा महिन्यात माझ्यावर 10 अग्रलेख सामनाने लिहिले. मला का एवढे महत्व देत आहेत, हे कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
हाथरस अत्याचार घटनेबद्दल चंद्रकांत पाटीलम्हणाले, उत्तर प्रदेशचे भाजपा कार्यकर्ते या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आक्रमक आहेत. आमची आतली आणि बाहेरची भूमिका वेगळी नसते. तसेच ओवेसी यांची प्रतिक्रिया चुकीची आहे. उत्स्फूर्त भावनेने व्यक्त झालेल्या लोकांनी हिंसा केली, असे म्हणता येणार नाही. हा हिंदूंचा अपमान ठरेल, असे पाटील ओवेसीच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना म्हणाले.
हेही वाचा -'बाबरीचा विद्ध्वंस झाला नसता तर, राम मंदिर बघायला मिळाले नसते'