मुंबई - स्वयंसेवी संस्थांकडून सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांमुळे जनतेचे जीवनमान सुसह्य होईल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्वयंसेवी संस्थांकडून सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती मंत्री पाटील यांनी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रामीण हेल्थकेअर, गोदरेज ग्रुप, रिलायन्स फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट, सलाम बॉम्बे, रत्ननिधी फाऊंडेशन, हॅबिटॅट फॉर ह्यूमॅनिटी इंडिया आदी संस्थांच्या प्रतिनिधीं उपस्थित होते. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती दिली. यावेळी ग्रामीण हेल्थकेअर संस्थेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेडिकल कॅम्प राबवून आरोग्य सुविधा पुरवल्या जात असल्याचे सांगून, जिल्ह्यात ५ ठिकाणी हेल्थ केअर सेंटर सुरु केले असल्याची माहिती दिली.
शेतकऱ्यासाठी उपयोगी कामे -
रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाजाविषयी माहिती मिळण्यासाठी आगामी वर्षभरात मोबाईल टॉवरवर ‘व्हेदर स्टेशन’ कार्यन्वित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी; यासाठी सॉईल सेन्सर कार्यन्वित करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तसेच राज्यातील वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी पुण्याच्या आयआयटीएमच्या सहकार्याने नवीन उपक्रम हाती घेतला असून, यामध्ये राज्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एखाद्या ठिकाणी वीज पडण्याची संभावना असल्यास त्याची माहिती स्थानिकांना ३० मिनिटे आधी देऊन, त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करता येईल.
कॅन्सर, शिक्षण यावर सुरू असलेली कामे -
रत्ननिधी फाऊंडेशनद्वारे वर्धा जिल्ह्यातील मुलांना मोफत पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य पुरवले जात असल्याची माहिती दिली. या कामाचे कौतुक करून, कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याची सूचना केली. तर टाटा ट्रस्टने राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध अभियानाअंतर्गत राज्य आणि कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून आल्याने, या भागावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटलांनी यावेळी केल्या.
‘मुख्यमंत्री मानद’च्या माध्यमातूनही कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध समाजोपयोगी कामांची यावेळी पालकमंत्र्यांना दिली. यामध्ये करवीर तालुक्यातील शाळांमध्ये ‘बोलक्या भिंती’ नावाने उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, नांदणी गावांमध्ये शोष खड्ड्यांमधील सांडपाण्याची व्हिलेवाट लावून, यातील पाण्याचा झाडांना किंवा शेतांसाठी पुनर्वापर करण्यासाठीचा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. या दोन्ही उपक्रमांचे मंत्री पाटील यांनी कौतुक करुन, हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याची सूचना केली. तसेच, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवले जाईल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली आहे.