मुंबई- माजी मंत्री अजित पवार यांचे मोठे काम आहे. शरद पवार यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी सरकारने कोणतेही काम केले नाही. त्यामुळे राज्य बँक घोटाळा आणि ईडी चौकशीचा काही संबंध नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे, असा पुनरोच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य शिखर सहकारी बँक प्रकरणात आरोप झाल्यानंतर शुक्रवारी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते जवळपास 18 तास कोणासमोरही आले नव्हते. त्यानंतर शनिवारी त्यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर मुद्दाम याप्रकरणी गोवण्याचा आरोप केला. यानंतर या प्रकरणी पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना छेडले असता, त्यांनी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा -साहेब जो आदेश देतील तो मान्य, राजीनाम्यानंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र राज्य शिखर सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 'ईडी'ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तक्रारदाराने न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयात यामध्ये लक्ष घातले. दरम्यान, राज्य सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणात भारतीय जनता पक्ष किंवा राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यावेळी पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात हे प्रकरण सुरू झाले. त्यानंतर जनहित याचिका दाखल झाली होती. एफआयआर दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य बँकेतील 25 हजार कोटींचा घोटाळा कोणी समोर आणला. शरद पवार यांचे नाव कोणी आणले, याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा -शिवसेनेशी वाईट वागले त्याचे फळ आता मिळतंय, उध्दव ठाकरेंचा पवारांना टोला
भाजपशासीत राज्य सरकारने मागील महिन्यात सहकारी कारखान्यांना आर्थिक मदत दिली आहे. याबाबत मदत ही राष्ट्रीय सहकार विकास मंडळाकडून दिली असून राज्य सरकार महामंडळावने ही मदत दिल्याचे पाटील म्हणाले. पवार कुटुंबातील माणसांमध्ये गृहकलह होऊ नये, म्हणून कोल्हापूरच्या अंबाबाईकडे मी प्रार्थना करणार, असल्याचेही ते शेवटी म्हणाले.