मुंबई- विश्वासदर्शक ठरावापूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा विधिमंडळाचा नियम आहे. मात्र, आज विश्वासदर्शक ठराव घेऊन उद्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येत आहे. ही कायद्याची तसेच घटनेची पायमल्ली आहे, असा आरोप आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्र्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली. हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा, अशी मागणी भाजप आमदाराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे. राज्यपालांनी न्याय दिला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.