मुंबई -भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबादारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी त्यांची नियुक्ती केली असून, त्यानुसार पत्र प्रसिद्ध केले आहे. तसेच मुंबई शहर अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नेमणूक केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील आणि लोढा यांच्या नावाची घोषणा केली आहे.
प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या नेत्यांची वर्णी लागेल अशी दाट शक्यता असताना पक्षाने चंद्रकांत पाटील यांची फेर निवड केली असून, मंगलप्रभात लोढा यांनाही मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवले आहे. पक्षाच्या अधिकृत पद्धतीनुसारच ही निवड केली असल्याचे पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगीतले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागेल व त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद चंद्रकांत पाटील यांना मिळेल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. तसेच पंकजा मुंडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाईल असेही बोलले जात होते. मात्र, पाटील यांचीच प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड झाल्याने या चर्चांना सध्या तरी पूर्ण विराम मिळाला आहे.