मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडणार आहे.
मुसळधार पावसाचा इशारा :उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये तसेच हिमालयात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढवली : गेल्या आठवड्याभरामध्ये मराठवाडा, विदर्भ त्याचप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल झाल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाडा आदी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालाय. गहू कांदा फळबागा भाजीपाला यांची पिके जमीन दोस्त झाली आहेत. आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.