मुंबई : तुमची होळीची तयारी पूर्ण झालेय का? नसेल तर थोडं थांबा कारण, होळीपूर्वी हवामानात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हवामान विभागाने एक इशारा दिला आहे. त्यानुसार सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. पण हवामान विभागाच्या माहिती नुसार येत्या काही दिवसांत अनेक विभागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सोबतच डोंगराळ भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाची अपडेट : भारतीय हवामान विभाग दररोज सकाळी हवामाना संदर्भात अपडेट माहिती जाहीर करत असते. आज विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आकाश ढगाळ असून लोकांना उष्णते सोबतच थंडी जाणवू लागली आहे, अशा परिस्थितीत होळीपूर्वी राज्यात पाऊस पडण्याची पूर्ण शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे तुम्हीही होळीच्या दिवशी कुठे जाणार असाल तर थोडे अधिक कपडे आणि रेनकोट सोबत ठेवा.
काही ठिकाणी तुरळक तर : हवामान विभागाच्या अदाजानुसार येत्या काही दिवसात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, या भागात हलक्या सरी, मेघगर्जनेसह पाऊस तर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात हलक्या सरी ठाणे जिल्ह्यात तसेच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस तर मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर वर्धा येथे तुरळक तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथेही विजांसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.