मुंबई - वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूएचईएफ)तर्फे बुधवारी 'चाणक्य' या बिझनेस अॅपचे सादरीकरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सीईओ व संचालक आशिष चौहान आणि डब्ल्यूएचईएफचे संस्थापक स्वामी विद्यानंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डब्ल्यूएचईएफ या फोरमच्या माध्यमातून जगभरातील हिंदू व्यावसायिक व व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. यावर्षी डब्ल्यूएचईएफ परिषद २७ ते २९ सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे.
डब्ल्यूएचईएफतर्फे वार्षिक परिषदांचेही आयोजन केले जात असते. यात अनेक व्यापारी, उद्योजक, बँकर, ट्रेडर आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि संपत्ती निर्मिती आणि व्यवस्थापनाबद्दलच्या त्यांच्या विचारांची यावेळी देवाणघेवाण होते. या नेटवर्कमध्ये जगभरातील मान्यवर सहभागी होतात. यंदा डब्ल्यूएचईएफचे हे आठवे वर्ष असून चाणक्य या बिझनेस अॅपच्या माध्यमातून त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जगभरातील हिंदू व्यापारांना एकसंध ऑनलाईन नेटवर्किंग व्यासपीठ प्रदान करण्याच्या हेतूने हे अॅप लाँच करण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध हिंदू व्यापाऱ्यांना एकमेकांशी संपर्क साधणे सोपे जाणार असून संपत्ती निर्मितीही याद्वारे साधली जाते.
''एकत्रितपणे यशस्वी व व्यावसायिक प्रयत्न केले तरच, भारतातील संभाव्य तंत्रज्ञान, तरुणांची संख्या व अन्य स्त्रोत आपण सक्षमपणे हाताळू शकू.'' असे डब्ल्यूएचईएफचे संस्थापक स्वामी विद्यानंद म्हणाले.