महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने, तर 'या' आहेत त्यांच्या जमेच्या बाजू

उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. ते शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री असतील. मात्र, मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करताना त्यांच्यासमोर कोणते आव्हाने असतील? तसेच त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या? याविषयी 'ईटीव्ही भारत'चे संपादक राजेंद्र साठे यांच्यासोबत चर्चा केली. त्या चर्चेतून घेतलेला हा आढावा...

challenges in front of uddhav thackeray as a cm
उद्धव ठाकरे

By

Published : Nov 28, 2019, 5:48 PM IST

Updated : Nov 29, 2019, 9:36 AM IST

मुंबई -सत्तानाट्याच्या शेवटी शिवसेनेलाच मुख्यमंत्री पद मिळाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ते ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती म्हणून विधानसभेत जाणार आहेत. त्यामुळे त्यांना राज्याचे नेतृत्त्व करताना, कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल? तसेच त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या? या अनुषंगाने घेतलेला हा आढावा...

ईटीव्ही भारतचे संपादक राजेंद्र साठे यांनी केलेले विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

उद्धव ठाकरेंच्या जमेच्या बाजू :

संघटनशक्ती -
बाळासाहेबांना वक्तृत्व कला आत्मसात होती. तसेच ते थेटपणे शिवसैनिकांशी जोडलेले होते. मात्र, मी गावोगावी भाषणे करून शिवसेनेवर फारसा प्रभाव पडलेला नाही. पण उद्धवने संघटना बांधली, असे बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणायचे. त्यामुळे त्यांनी उद्धव यांच्यावर शिवसेनेची जबाबदारी सोपवली. त्यांनी आतापर्यंत शिवसेना संघटित करून ठेवली. त्यांचा संघटनशक्ती हा गुण राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळताना कुठेतरी फायदेशीर ठरेल.

उद्धव ठाकरेंच्या संघटनशक्तीचे उदाहरणच द्यायचे झाले, तर राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी शिवसेनेला घरघर लागली, असे बोलले जात होते. तसेच त्यावेळी मालवणमध्ये शिवसेनेचा पराभव झाला होता. त्यामुळे कोकण शिवसेनेपासून दूर गेले, असेही बोलले जात होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संघटनशक्तीमुळे शिवसेना आताही टिकून आहे.

संयमी स्वभाव -
उद्धव ठाकरे राजकारणात रमणारे व्यक्तिमत्व नव्हते. बाळासाहेबांच्या काळात सुरुवातीला राज ठाकरेंचे शिवसेनेवर प्रभुत्त्व होते. राज ठाकरेंकडे बाळासाहेबांसारखे भाषणशैली आहे. तसेच त्यांचे व्यंगचित्राचे गुण देखील राज ठाकरेंनी अवगत केले आहेत. त्यातच उद्धव शामाळू, संयमी स्वभावाचे होते. त्यामुळे ते राजकारणापासून दूरच होते. मात्र, राज ठाकरे बाहेर पडले. त्यानंतर हळूहळू उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या संयमी स्वभावामुळेच त्यांनी शिवसेनेची जबाबदार व्यव्यस्थित सांभाळली, असेही म्हणता येईल.

निर्णय क्षमता -
उद्धव ठाकरेंच्या लाजाळू स्वभावामुळे ते निर्णय घेऊ शकत नाही, असे अनेकांना वाटत असेल. मात्र, त्यांनी आतापर्यंत उतावीळपणे, घाईघाईने निर्णय घेतलेले नाहीत. ते प्रत्येक निर्णय शांततेने घेतात. तसेच त्यांना हवे तेच निर्णय ते घेत असतात. मग ते उमेदावारांना तिकीट वाटप करताना असो, की त्यांच्या निकटवर्तीयांबद्दल प्रत्येक निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतलेले आहे. त्यांच्या या निर्णय क्षमतेमुळे मुंबई महापालिकेवर आतापर्यंत त्यांची सत्ता टिकून आहे, असेही म्हणता येईल.

उद्धव ठाकरेंच्या उणीवा :

शेतीचे ज्ञान? -
उद्धव ठाकरे मुंबईसारख्या शहरात वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांना शेतीविषयक ज्ञान नाही. तसेच ग्रामीण भागाबद्दल देखील त्यांना तेवढी माहिती नाही. आतापर्यंत महाराष्ट्राचा असा एकही मुख्यमंत्री नव्हता की त्याला शेतीविषयक ज्ञान नसेल. मात्र, काही दिवसांपासून ते दुष्काळ दौऱ्यावर जात आहेत. त्यामधून ते शेती विषयक माहिती घेताना दिसतात. ही त्यांची जमेची बाजू नसली, तरी त्यांचा दुष्काळ दौरा तसेच शेतकऱ्यांसाठी केलेली आंदोलने काही प्रमाणात त्यांना साथ देईल, अशी अपेक्षा आहे.

विधीमंडळाचे कामकाज -

उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत प्रशासनामध्ये कुठलेही पद भूषवले नाही. तसेच कधीही प्रशासन हाताळले नाही. विधीमंडळाचे काम खूप महत्त्वाचे असते. मात्र, त्यांना या कामाचा अनुभव नाही. उद्धव ठाकरेंनी कोणत्याही संसदीय परंपरेत काम केले नाही. तसेच आमदार म्हणून काम केलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्त्व करताना या बाबी त्यांच्यासमोर आव्हान ठरणार आहेत.

मुंबई वगळता महाराष्ट्राचे ज्ञान? -
बाळासाहेब वगळता ठाकरे घराण्यातील कोणालाच संपूर्ण महाराष्ट्राची माहिती नाही. महाराष्ट्रात जातीच्या भयाण वास्तवाची माहिती त्यांना नाही. तसेच ग्रामीण भागातील राजकारणाची माहिती नाही. त्यांना मुंबईची माहिती असली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच त्यांना सहकार क्षेत्राची माहिती नाही. त्यामुळे त्यांची ही उणीव त्यांच्यासमोर खूप मोठे आव्हान ठरणार आहे.

तीन पक्षीय सरकार -

शिवसेना हा एकाच माणसाच्या आदेशाने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना या गोष्टींची सवय झालेली आहे. मात्र, आता राज्यात ३ पक्षांचे सरकार स्थापन होत आहे आणि उद्धव ठाकरे त्याचे नेतृत्व करीत आहेत. तसेच एक हाती सत्ता असलेल्या पक्षाला सर्वांना सोबत घेऊन चालवावं लागतंय. मात्र, उद्धव ठाकरेंमध्ये या गुणाची उणीव भासते. त्यामुळे आता ते ३ पक्षांचे सरकार कसे चालवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री बनल्यानंतर पक्ष विस्तार करण्याची संधी :
राज्यात गेल्या काही वर्षात शिवसेनेची ताकद घटत चालली आहे. मुंबई महापालिकेमध्ये सेनेची सत्ता आहे. मात्र, त्याठिकाणी देखील आता त्यांची ताकद घटलेली आहे. कारण मुंबईमध्ये मराठी माणसांची संख्या जेमतेम २० टक्क्यांपर्यंत येऊन ठेपली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करता आला नाही. मात्र, आता राज्याचे नेतृत्त्व करताना पक्षाचा विस्तार करण्याची चांगली संधी मिळत आहे. त्यामुळे आता या संधीचा फायदा घेऊन उद्धव ठाकरे शिवसेना आणखी किती मजबूत करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : Nov 29, 2019, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details