मुंबई- शहरातील धारावी, वरळी, लालबाग, सायन, कोळीवाडा या गजबजलेल्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका धारावीच्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याने धारावी परिसरात काही इमारती बंद करण्यात आल्या आहेत.
धारावी ही आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाते. धारावीत जवळपास दहा लाख लोक दाटीवाटीने राहतात. झोपडपट्टीचा परिसर असल्याने इथे सोशल डिस्टनस पाळणे अवघड असून हेच मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
मुंबईतील गजबजलेल्या वस्तीत कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने पुढचे काही दिवस संचारबंदीचे नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा झोपडपट्टी भागात संसर्ग झाल्यास यावर नियंत्रण मिळवणे अवघड असल्याचे सरकारी अधिकारी खासगीत सांगत आहेत.
झोपडपट्टी भागात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण, शौचालयासाठी व अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी झोपडपट्टीवासियांना बाहेर जावे लागते. त्यामुळे झोपडपट्टी भागात एकामागोमाग रुग्ण आढळत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखणे पोलीस व सरकार पुढे मोठे आव्हान आहे.