मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधींना अपयशी करण्यासाठी काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाने म्हटले आहे. तसेच राजस्थानातील सत्तासंघर्षात तेथील फोन टॅपिंगमुळे अनेक जणांचे पितळ उघडे झाले आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरुन ऐकले आणि ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी अनेक गौफ्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना नीट कामच करु न देणे, हे काही लोकांचे ध्येय असल्याचेही दै. सामनाने म्हटले आहे. मात्र, या प्रकाराचा फटका सर्व विरोधी पक्षाला बसतो. फोन टॅपिंग हा प्रकार गुन्हा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आहे. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हे घटनेच्या विरुद्ध आहे, त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवणे आवश्यक आहे, असेही दै. सामनाने म्हटले आहे.
राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष अजूनही सुरू आहे. सचिन पायलटांचे अन्यायाविरूद्ध बंड वगैरे खोटे होते. त्यांना भाजपासोबत घोडेबाजार करुन गेहलोत सरकार पाडायचे होते. याचा खुलासा एका ऑडिओ क्लिपद्वारे मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव आणि पैशांचा वापर झाला. मात्र, काँग्रेसने हा डाव हाणून पाडला. तर राजस्थान सरकारने बेकायदेशीर फोन टॅपिंग केले, असा आरोप भाजपने केला. याप्रकरणाची चौकशी केंद्रीय गृहखाते करणार असल्याचीही माहिती आहे. कोणाचेही खासगी भाषण चोरुन ऐकणे गुन्हाच आहे. यासंबंधित चौकशी करणे योग्यच आहे. मात्र, जर गेहलोत सरकारने हे संभाषण ऐकले असेल तर अशी कोणती आणीबाणी देशात किंवा उद्भवली? असा सवालही शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.
सत्तेच्या लालसापोटी राजस्थानमध्ये घोडाबाजार सुरू होता. पायलट यांचे बंड फसल्याने हा प्रकार समोर आला आहे. हा जनतेशी आणि लोकशाहीसोबत केलेला विश्वासघात आहे. यानंतर पुराव्याच्या आधारावर गेहलोत सरकारने भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. मात्र, याबाबत भाजप बोलायलाही तयार नाही. फोन टॅपिंग हा गुन्हा आहेच. मात्र, यासोबत घोडेबाजार करणेही गुन्हाच आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांनी या केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई का केली नाही? असा सवालही शिवसेनेने केला आहे. आधी मंत्री शेखावत यांचा राजीनामा घ्या मग गेहलोत सरकारवर आरोप करा, अशा शब्दात सामनाने खणकावले आहे.
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार जनतेने निवडून दिले नाही. त्यामुळे या सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस करतात. मात्र, बहुमताचा आकडा गाठणे, हीच लोकशाही आहे, हे त्यांनी मान्य करायला हवे. तर दुसरीकडे राजस्थानातील गेहलोत सरकार लोकांनी निवडून दिले आहे तरी ते पाडण्याचा उद्योग सुरू आहे. मध्यप्रदेशातही लोकांनी निवडून दिलेले सरकार होते. तेदेखील पाडण्यात आले. मात्र, राजस्थानात पुन्हा तोच घोडेबाजार करताना, पायलट आणि भाजपचे पितळ उघडे पडले. राजस्थानमध्ये भाजपची अवस्था 'केले तुका झाले माका' अशी झाल्याचा टोमणाही शिवसेनेने लगावला आहे.
काँग्रेसच्या कार्यप्रणालीवर टीका करण्याची गरज नाही. त्यांच्यात काही अंतर्गत वाद आहेत. अर्थात राहुल गांधी यांना अपयशी करण्यासाठीच हे वाद काही ठरावीक लोकांच्या माध्यमातून निर्माण केले जातात आणि मध्यप्रदेशातील सरकार गेले, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. तर फोन टॅपिंग हा गुन्हा आहे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आहे. घटनेच्या नियमांनी सत्तेत आलेले सरकार घोडेबाजार करुन पाडणे हा घटनाद्रोह आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.