मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या काही दिवसांपासून 15 हजाराहून अधिक रुग्ण संक्रमित होत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने विविध जिल्ह्यांंमध्ये संचारबंदी, अंशत: टाळेबंदी, कडक टाळेबंदी लागू करून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, जवळपास सर्वत्र टाळेबंदीला व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला असून टाळेबंदीऐवजी कडक नियम लागू करून दंडही वाढवावा, अशी मागणी केली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्याचा प्रत्यय मुंबईतील दादरच्या भाजी बाजारामध्ये आला. आज भाजी खरेदी करण्यासाठी दादर बाजारात लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तर नागपुरात मागील तीन दिवसांत 2 हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील काही दिवसात नागपूरमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने अशंत: टाळेबंदीच्या पर्यायानंतर आता कडक टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली, मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
यवतमाळमध्ये चाचणी केलेल्यांनीच दुकान उघडावे
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा दर वाढतच चाललेला आहे. यवतमाळ शहरासह इतर तालुक्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, चहाटपरी, उपहारगृह, पानटपरी यासह इतर दुकानदारांना कोविडची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तपासणी करणार नाही, तोपर्यंत दुकाने सील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली आहे.
जळगावातील कोविड केंद्राममधून रुग्णांचा काढता पाय
जळगावजिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक होत असताना आरोग्य यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय जामनेरात आला आहे. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील धारिवाल पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये उभारलेल्या शासकीय कोविड केंद्रामध्ये रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या 50 पैकी 15 रुग्णांनी कोविड केंद्राममधून काढता पाय घेतला.
नाथषष्ठी यात्रा यावर्षी रद्द