मुंबई- रेल्वे स्थानक आणि त्यांच्या आसपासच नाही तर रेल्वे रुळांवरही स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने सातत्याने विविध उपाययोजना करत आहे. शहराचा ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान व हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान कचरा काढण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छता रथ' चालवते. गेल्या 12 महिन्यांत याद्वारे 95 हजार घनमीटर कचरा ट्रॅकवरून उचलण्यात आला.
रेल्वे रुळाच्या आजूबाजूला टाकण्यात येणारी घाण आणि कचऱ्यामुळे केवळ रेल्वे रुळ घाणेरडेच दिसत नाही तर, त्याखालील गटारांतही घाण अडकते ज्यामुळे पावसाळ्यात रुळावर पाणी साचते. नेहमी रेल्वेसेवा कमी असताना मध्यरात्री हे रथ चालत असत, पण आता लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेने दिवसाही हे स्वच्छता रथ चालवले. यात घाण आणि कचरा साफ केल्यावर गोणीत भरले जाते. त्यानंतर 'स्वच्छता रथ' स्पेशल रेल्वेमध्ये या गोणी भरल्या जातात.