मुंबई- रेल्वे स्थानकात तोतया टीसींनी (तिकीट कलेक्टर) प्रवाशांकडून दंड वसूल केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत, अशा बोगस टीसींना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणीकांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र गळ्यात घालण्यासाठी दिले आहे. प्रवाशांना पेटीएम, भीम अँपच्या माध्यमातून मोबाईलवर क्यूआर कोड स्कॅन करताच खऱ्या टीसीची ओळख पटणार आहे.
टीसींना मिळणार बारकोड आयडी, तोतया टीसींवर आळा घालण्यासाठी रेल्वेची शक्कल - mumbai railway
रेल्वे स्थानकात तोतया टीसींनी (तिकीट कलेक्टर) प्रवाशांकडून दंड वसूल केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत, अशा बोगस टीसींना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणीकांना क्यूआर कोड असलेले ओळखपत्र गळ्यात घालण्यासाठी दिले आहे.
काळे कोट परिधान करून कोणीही प्रवाशांकडून दंड वसूल करत असल्याचे अनेक प्रकार याआधी समोर आले आहेत. यातून प्रवाशांची लूट होत होती. अशा बोगस तिकीट तपासणीकांना आळा घालण्यासाठी ठाणे स्थानकापासून सुरुवात करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन करताच त्यानंतर मोबाईलवर उघडलेल्या लिंकवरून तिकीट तपासणीकाचा तपशील पाहायला मिळणार आहे.
मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांनी ही संकल्पना मांडली आहे. प्रायोगिक तत्वावर ८ तिकीट तपासणीकांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिसदानंतर उपनगरीय रेल्वेवर हे ओळखपत्र टीसींना देण्यात येणार आहे.