मुंबई -मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 17 डिसेंबर 2020 ला एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे एसी लोकल रिकामी धावत होती. मात्र, 1 फेब्रुवारी २०२१ पासून सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा दिल्यामुळे लोकलची प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली असून, गेल्या सहा दिवसात दीड लाखापेक्षा जास्त रुपयांची कमाई झाली आहे.
हेही वाचा -बाळाचे मस्तक धडावेगळे करून आईची चालत्या लोकलमधून उडी
प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली
मध्य रेल्वे मार्गावर दुसरी एसी लोकल 17 डिसेंबर 2020 पासून सीएसएमटी ते कल्याण धिम्या मार्गावर धावू लागली होती. सर्वसामान्याच्या दहा फेऱ्या रद्द करत त्याजागी एसी लोकलच्या 10 फेऱ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य सरकारने मान्यता दिलेल्या 20 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्यात आलेली होती. त्यामुळे, एसी लोकलला प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र, आता 1 फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिल्याने प्रवासी संख्या झपाट्याने वाढलेली आहे. मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आहे.