मुंबई -मध्य रेल्वेची रेल्वे स्थानके नेहमीच चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय आहे. २०१९- २० या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर २१ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले असून, त्या माध्यमातून ४४.५२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक उत्पन्न हे एकट्या पुणे विभागातून मिळाले आहे.
कोट्यवधी रुपयांची कमाई-
मध्य रेल्वेने २०१९-२० मध्ये २१ चित्रपटांच्या चित्रीकरणातून १.३३ कोटी रुपये उत्पन्न मिळविले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ‘पंगा’ चित्रपटासह ८ चित्रपटांच्या चित्रीकरणातून ४४.५२ लाख, आपटा स्थानकात ४ फिल्म चित्रीकरणातून २२.६१ लाख रूपये उत्पन्न मिळाले. पनवेल स्थानकात रजनीकांत स्टारर फिल्म ‘दरबार’ कडून सर्वाधिक २२.१० लाख उत्पन्न मिळविले. पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमान स्टारर ‘दबंग 3’ याच्या परवानगी आणि शुल्कासाठी १५.६२ लाख यासह ३ चित्रपटांमधून ३७.२२ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. पुणे ते मुंबई दरम्यान ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचे चित्रीकरण, तुर्भे आणि वाडीबंदर यार्ड, पुणे स्टेशन यासारख्या चित्रपटाच्या शूटिंग ठिकाणांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले.