मुंबई- मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ आज (बुधवारी) सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात होता. मात्र, दिड तासांच्या दुरुस्ती कामानंतर मध्य रल्वेची खोळंबलेली सेवा सुरु करण्यात आली आहे.
विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली ओव्हर हेड वायरची दुरुस्ती केली असली तरी लोकल, मेल आणि पॅसेंजर गाड्या उशिराने धावत आहेत. संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल उशिराने धावत आहेत.
विस्कळीत झालेली रेल्वे सेवा सुरू होण्यास दीड तासांचा अवधी लागला. लोकलचा पेंटोग्राफ तुटल्यामुळे वायर अंगावर पडल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अंबरनाथ, कार्जत-खोपोली आणि कल्याण-डोंबिवली-ठाणे दरम्यान विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच अप मार्गावर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांनाही थांबा देण्यात आला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने गर्दी कमी करण्यासाठी ही सुविधा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण स्थानकादरम्यान अप लाइनवरील ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून, सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. या संदर्भातील माहीती मध्ये रेल्वेने ट्विटरवरुन दिली. तसेच असुविधेबद्दल दिलीगीरी व्यक्त केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेने ही या मार्गावर जादा बस सोडल्या आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मध्ये रेल्वेवर तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या आहेत. रोजच काहीतरी नवीन अडचण येवून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सकाळी एन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने तर चाकरमान्यांचे आणखीनच हाल होतात.