मुंबई - पावसाळ्यात सुरळीत सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने पावसाळ्याची तयारी केली आहे. गटारे नाले साफ करणे, झाडे सुशोभित करणे, दरडींचे स्कॅनिंग करणे, पाणी तुंबणाऱ्या असुरक्षित ठिकाणी उच्च व्होल्टेज पंपांची व्यवस्था, मल्टी-सेक्शन डिजिटल काउंटर इ. तरतूद करण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी मार्गावर तसेच घाटांमध्ये मान्सून खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
मध्य रेल्वेने मुसळधार पावसात पाणी तुंबणारे 17 असुरक्षित ठिकाणे शोधून काढली आहेत आणि त्या ठिकाणी 140 हून अधिक पंपांची (रेल्वे व बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे) तरतूद केली आहे. यावर्षी पूर टाळण्यासाठी पूरग्रस्त ठिकाणी जास्त संख्येने व अधिक क्षमतेचे पंप वाढविण्यात आले आहे. मुख्य मार्गावर मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नाणीपाडा, ठाणे, डोंबिवली व हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे आणि तसेच मुख्य मार्गावरील दक्षिण-पूर्व दिशेकडील कि.मी 65 /7-8 व किमी 75/1-2 येथील भुयारी मार्ग (सबवे) अशी काही ठिकाणे चिन्हांकित करण्यात आली आहेत.
उपनगरी भागात 113 कि.मी नाल्यांची साफसफाई
मध्य रेल्वेने आपल्या उपनगरी भागात 113 कि.मी नाल्यांची साफसफाई केली आहे. तसेच उपनगरी भागातील मुख्य मार्गावरील 55 आणि हार्बर मार्गावरील 22 असे एकंदर 77 कल्वर्टसची साफसफाई केली आहे. घाटकोपर - कांजूरमार्ग, घाटकोपर - विक्रोळी दरम्यानचे नाले आणि कुर्ला टर्मिनल नाला हे अतिशय महत्वाचे नाले साफ केले आहेत.
मध्य रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागातील उदा. कसारा ते इगतपुरी दरम्यान, 18 बोगद्यांची तपासणी करण्यात आली, दरडींचे स्कॅनिंग करण्यात आले, 40 दरड शोधून कोसळविण्यात आले आहेत. शिवाय, 14 ठिकाणी 50 पाहरेकरी तैनात केले जात आहेत आणि 24×7 अशी सातत्याने देखरेख ठेवण्यासाठी आणि वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून 7 बीट्सवर 75 गस्तीदार तैनात केले जात आहेत.