मुंबई -देशाची आर्थिक राजधानी आणि मेगासिटी असणार्या मुंबईतील अनेक रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळालगत शौचास जाण्याची आणि कचरा फेकणार्यांची संख्या मोठी होती. याला आळा घालण्यासाठी रेल्वेने स्थानक परिसर तसेच रेल्वे रुळांभोवतीची स्वच्छता मोहीम रेल्वेने तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर ( Central Railway ) 1 लाख 66 हजार घनमीटर कचरा विशेष रेल्वे गाडीने ( पाच स्वच्छता रथ ) उचलत एक नवीन विक्रम आपल्या नावाने केला आहे.
1.66 लाख घनमीटर कचरा -लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोरील आव्हान ठरते. मात्र, गेल्या वर्षभरात रेल्वे विभागाकडून मेल, एक्स्प्रेस, स्थानकातील परिसर, रेल्वे मार्ग, प्रसाधनगृह, रुळांजवळील वसाहती अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. मुंबईतील रेल्वेच्या सर्व मार्गांवर मिळून 75 लाखा पेक्षा जास्त प्रवासी ये-जा करत असून मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांचीही यामध्ये भर पडते. सर्व मार्गांजवळील वसाहतींमधून रुळांवर पडणारा तसेच प्रवासात प्रवाशांकडून रुळांवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याने नाले तुंबण्याची समस्या निर्माण होते. 2021-22 या वर्षात उपनगरीय विभागातील ट्रॅकमधून 1.66 लाख घनमीटर गाळ तथा कचरा साफ करण्यात आला. मुंबई उपनगरीय विभागांमध्ये रविवारी मेगा मेंटेनन्स ब्लॉकचा फायदा घेऊन महत्त्वपूर्ण भाग स्वच्छ करण्यात आला आहे.