मुंबई : पावसाळ्यात मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासनाने समन्वय साधत योग्य उपाययोजना केल्याने गेल्या वर्षी मुंबईची लाइफलाईन थांबली नाही. यावर्षीही मध्य रेल्वेने पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी घेतली आहे. मध्य व हार्बर मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका असणाऱ्या ठिकाणी आरपीएफच्या फ्लड रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्या आहेत. बदलापूर, ठाणे, माटुंगा, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी प्रत्येकी एक अशा पाच बोटी पाच स्थानकांजवळ तैनात करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.
६२ हजार क्युबिक मीटर कचरा साफ :दरवर्षी पावसाळ्यात विशेष करून मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर अनेक कारणांनी प्रवाशांची गैरसोय होत असते. ती टाळण्यासाठी यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. पावसाळ्यात ओव्हरहेड वायरवर तुटने, झाड कोसळण्याचा घटनांचा धोका जास्त असतो. त्यामुळे यंदा मध्य रेल्वे मार्गावरील 50 ठिकाणी झाडांची छाटणी करण्यात आली, 88 कल्हर्टर साफ केली गेली आहेत. तसेच रुळांखालून जाणारी गटारे जोडण्यात आल्यामुळे यंदा रुळांवर पाणी जमा होण्याचा धोका फार कमी आहे. मध्य व हार्बर मार्गावरील कल्हर्टर व गटार साफ करण्यात आली आहेत. यंदा 62 हजार क्युबिक मीटर कचरा रेल्वे हद्दीतून उचलण्यात आला आहे.
धोका टाळण्यासाठी वॉटरप्रूफ केबल :दरवर्षी प्रमाणे यंदाही कंट्रोल रूम 24 बाय 7 कार्यरत राहणार आला आहे. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलीस आदी यंत्रणांशी समन्वय साधत आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात केबलमध्ये पाणी जाऊन धोका उत्पन्न होतो. त्यामुळे यावर्षी पाणी जमा होऊन काही आपत्कालीन परिस्थिती ओढावू नये, यासाठी केबल वॉटरप्रूफ केल्या गेल्या आहेत. रेल्वे हद्दीत पडणाऱ्या पावसाची दर 1 तासाला नोंद होणार असून, पावसाची नोंद अधिक झाल्याचे निर्दशनास येताच मध्य रेल्वेची यंत्रणा त्वरित कार्यरत होईल, असेही शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.