मुंबई -अतिवृष्टीने दरड कोसळून चेंबूर आणि विक्रोळी येथे नुकतीच दुर्घटना घडली. त्यात अनेकजण मृत्यूमुखी पडले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई, ठाणे आदी महानगर क्षेत्रातील धोकादायक डोंगराळ ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन करावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. चेंबूरच्या भारत नगर येथील भिंत कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची आठवले यांनी आज (23 जुलै) भारत नगर येथे सांत्वनपर भेट घेतली.
'मदत निधीने जीव परत येणार नाही'
दरड कोसळून मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 5 लाखांच्या मदतीचा धनादेश आज देण्यात आला. तसेच केंद्र सरकारतर्फे 2 लाखांचा निधी लवकर देण्यात येईल, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. 'शासनाच्या 5 लाख रुपयांच्या निधीने दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांचे प्राण पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटनेत कुणाचा मृत्यू होऊ नये; अशा दुर्घटनाच होऊ नयेत यासाठी डोंगराळ भागातील धोकादायक ठिकाणच्या झोपड्यांचे कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे. या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे. तसेच दुर्घटनेत घरे गमावलेल्या झोपडीवासियांना शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे. तेथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे या दुर्घटनाग्रस्त झोपडीवासियांचे मुंबई मनपा, एसआरए, एमएमआरडीए या प्राधिकरणाचा समन्वय साधून तात्पुरत्या घरांमध्ये स्थलांतरित करावे', अशी सूचना आठवले यांनी केली. चेंबूर आणि विक्रोळी सुर्यनगर येथे भेट दिल्यानंतर आठवले यांनी शिवाजीनगर गोवंडी येथे दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.