मुंबई -वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे लहान भाऊ भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून आस्थेने माहिती घेतली. प्रकाश आंबेडकर रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांची भेट घेऊ असे आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना सांगितले.
प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडी तर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेचे नेतृत्व करत आहेत. या दोन नेत्यांची राजकीय वाटचाल वेगवेगळी राहिली असली तरी, दोघांमध्ये आपलेपणाची जाणीव असल्याची प्रचिती दोघा नेत्यांनी दाखविली. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याचे कळताच आठवले यांनी भीमराव आंबेडकर यांना दूरध्वनी करून प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच त्यांची काळजी घ्या, मी लवकर भेटायला येईन, असा निरोप दिला.