मुंबई- मोदी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केला नाही व होऊ दिला नाही असा दावा केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. मुंबईतील लोकसभेच्या ६ जागांसाठी मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठेची लढत समजली जाणारी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे सोमवारी 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमात ते सहभागी झाले.
या 'चाय पे चर्चा' कार्यक्रमात दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांनी देशातील कर प्रणालीच्या संदर्भात आणि विशेष करून जीएसटीच्या संदर्भात पियुष गोयल यांच्याकडे विविध मागण्या केल्या. यावर काही व्यापाऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्यावर उत्तर देताना पियुष गोयल म्हणाले की, आम्ही गरीबांचा टॅक्स कमी केला. काही श्रीमंतांचा टॅक्स वाढला असेल म्हणून ते काँग्रेस उमेदवाराला जिंकवण्यासाठी व्हिडीओ देत आहेत, असे म्हणत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी मुकेश अंबानींना टोला लगावला. आमचे सरकार भेदभाव करत नाही. काँग्रेसवाल्यानी सांगावे की त्यांना राम मंदिर हवे आहे की नाही.