मुंबई - केंद्र सरकारच्या अगोदरच आम्ही कोरोनाच्या लढाईविरोधात सावध होतो. म्हणूनच आम्ही एक आठवड्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले. आज आम्ही केवळ कोरोनाच्या संकटावरच पूर्ण लक्ष केंद्रित करून आहोत. परंतु, केंद्राकडून आम्ही पीपीई कीटसह इतर साहित्य मागतोय तेही केंद्र वेळेवर देत नाही. किमान आता केंद्राने जीएसटीचे आमचे १६ हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केली. तसेच आम्ही राज्याला सुरक्षीत ठेवून कोरोनाचे संकट परतवून लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ऑनलाईन पत्रकार आयोजित केली होती. त्यावेळी थोरात बोलत होते.
मंगळवारी वांद्रे येथे झालेल्या घटनेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. याबाबत थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, की आम्ही वांद्र्याच्या प्रकरणात राजकारण करू पाहत नाही. ते रेल्वेच्या चुकीमुळे झाले आहे. १४ तारखेला दुपारपर्यंत रेल्वेचे बुकिंग सुरू होते. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज झाला होता. त्यासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. तसेच चुकीचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानेही हे सर्व झाले आहे. हे कोणी केले? याची चौकशी करण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील जनता अडचणीत असल्याने आमचे सर्व लक्ष कोरोनावर आहे. त्यामुळे राज्यात किती महसूल बुडत आहे याकडे पाहत नाही. हे संकट दूर झाल्यावर आम्ही महसुलावर पुन्हा लक्ष देवू, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.