मुंबई :मुंबईतील गोरेगाव येथे पोलिसांनी नकली आधार कार्ड आणि पॅन कार्ड ( Fake Aadhaar Card and PAN Card ) तयार करणाऱ्या केंद्राचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या केंद्राचा चालक अरुगेशकुमार मिश्रा वय ४२ वर्षे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 आधार कार्ड आणि सात पॅन कार्ड देखील जप्त केली आहेत.
बोगस पॅन कार्ड आणि आधार कार्ड : मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पश्चिमेकडील प्रेम नगर परिसरात आरोपी आरोगेशकुमार हा मागील अनेक वर्षांपासून नागरी सुविधा केंद्र चालवत होता. या केंद्राच्या माध्यमातून तो नागरिकांकडून पैसे घेऊन बोगस पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गोरेगाव पोलिसांनी रविवारी या सुविधा केंद्रावर छापा मारला.
डमी ग्राहकाचा फॉर्म सुद्धा जप्त : तत्पूर्वी पोलिसांनी पॅन कार्ड बनवण्यासाठी एक डमी ग्राहक तयार करून या केंद्रावर पाठवला होता. आरोपी केंद्र चालकाने यासाठी त्याच्याकडून 1000 रुपये स्वीकारत त्यास सोमवारी पॅन कार्ड घेण्यासाठी बोलावले होते. याच वेळी पोलिसांनी त्या केंद्रावर छापा मारला आणि तपास केला असता नकली आधार कार्ड वेगवेगळ्या नावाचे पॅन कार्ड आणि डमी ग्राहकाचा फॉर्म सुद्धा जप्त केला. यावेळी पोलिसांनी आधार कार्ड सोबत अनेक मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व नंबर सुद्धा नकली असल्याचे आढळून आले.
न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली : गोरेगाव पोलिसांनी आरोपी मिश्रा विरोधात भादवी 420, 465, 466, 468 आणि 471 नुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक देखील केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.