मुंबई - यंदाची दिवाळी कोविडच्या सावाटाखाली साजरी केली जात असली, तरी कोविडबाबतच्या नियमांचे पालन करा, घरात राहून दिवाळी दणक्यात साजरी करा. पालिकेने केलेली तयारी फुकट गेली तरी चालेल, मात्र मुंबईकरांनो कोरोनाबाधित होऊ नका, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुंबईत येणाऱ्या लोकांमुळे दुसरी लाट -
वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या संस्थेमार्फत झालेल्या सन्मान कार्यक्रमानंतर महापौर पत्रकारांशी बोलत होत्या. यात, सर्व दुसरी लाट येणार असे बोलत आहेत. मात्र, ही दुसरी लाट नेमकी काय आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिल्ली सारख्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. देशभरात विमान, ट्रेन सेवा सुरू झाल्यावर रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
भाजपला टोला -
भाजपच्या मंदिर उघडण्याच्या मागणीबाबत बोलताना, मंदिर आणि इतर व्यवहार उघडा म्हणून सर्व मागणी करत आहेत. कोणालाही मंदिर आणि इतर व्यवहार बंद ठेवावे असे वाटत नाही. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी असल्याने मंदिर आणि काही व्यवहार बंद असल्याचे महापौरांनी सांगितले.
काळजी घेण्याची गरज -
दुसरी लाट येऊ नये, रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या कमी असल्याने कोरोना केअर सेंटरमधील सेवा बंद केली आहे. मात्र, ती पूर्णत: बंद केलेली नाही. दुसरी लाट आलीच तर आम्ही सज्ज आहोत. ऑक्सिमीटर पासून व्हेंटिलेटर पर्यंत सर्व यंत्रणा सज्ज आहे. कर्मचाऱ्यांपासून डॉक्टर, सर्व मनुष्यबळ सज्ज आहे. मुंबई महापालिकेने सर्व तयारी केली असल्याने मुंबईकरांनो घाबरू नका. असे महापौरांनी सांगितले.
घरात राहून दिवाळी साजरी करा -
कोरोनामुळे अनेक कुटुंबांमध्ये जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. या दिवाळीत एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू आहेत. माझ्या घरातही कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नियमांचे पालन करून काळजी घ्या व घरात राहून दिवाळी साजरी करा, असे आवाहन महापौरांनी केले.
तसेच, कोणाला संपवणे ही मानवाची वृत्ती नाही. तरीही जगभरातून कोरोना विषाणू संपवू, अशी जगदंबे चरणी प्रार्थना करत महापौरांनी मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा-युएईमधून आणलं सोनं; क्रिकेटपटू कृणाल पांड्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात