महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांश पडला त्या गटाराचे झाकण १ जुलैलाच काढण्यात आले; सीसीटीव्ही फुटेजमधून बाब उघड - आंबेडकर नगर

मागील आठवड्यात बुधवारी रात्री गोरेगाव आंबेडकरनगर येथील उघड्या गटारात दिव्यांश सिंह हा मुलगा पडला होता. या गटारावर झाकणे लावण्यात आली होती. मात्र, ती झाकणे १ जुलैला काढण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पालिकेने पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

दिव्यांश पडला त्या गटाराचे झाकण १ जुलैलाच काढण्यात आले

By

Published : Jul 15, 2019, 9:09 PM IST

Updated : Jul 15, 2019, 10:29 PM IST

मुंबई- मागील आठवड्यात गोरेगावमधील आंबेडकरनगर येथील गटारात दिव्यांश सिंह हा दीड वर्षीय मुलगा पडून वाहून गेला होता. या गटारावर झाकणे लावण्यात आली होती. मात्र, ती झाकणे १ जुलैला काढण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पालिकेने पोलिसांच्या स्वाधीन केले असून संबंधितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यांश पडला त्या गटाराचे झाकण उघडतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद

मागील आठवड्यात बुधवारी रात्री गोरेगाव आंबेडकरनगर येथील उघड्या गटारात दिव्यांश सिंह हा मुलगा पडला होता. शोध मोहीम राबवूनही अद्याप त्याचा पत्ता लागलेला नाही. हा मुलगा उघड्या गटारात पडल्याने पालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. दिव्यांशप्रकरणी पालिकेची चूक असल्याने पालिका कार्यालयावर मोर्चेही काढण्यात आले होते. दिव्यांशला शोधण्यासाठी आजूबाजूच्या गटारावरील सिमेंट काँक्रेटचे सज्जे तोडण्यात आले. एनडीआरएफला बोलावूनही दिव्यांशचा शोध लागला नाही. पालिकेने २९ जूनलाच याठिकाणी नाले सफाई झाल्यावर गटारावर झाकणे लावण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, प्रकरण ताजे असल्याने व दिव्यांशचा शोध घेण्याच्या कामाला प्राधान्य दिल्याने पालिकेने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नव्हती.

याप्रकरणी पालिकेने दिंडोशी पोलिसांकडे एक पत्र लिहिले असून याबाबतचे सीएसटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. १ जुलैला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले होते. मालाड पूर्व येथील आंबेडकर चौक आणि आसपासच्या परिसरातही प्रचंड पाणी साचले होते. त्याचवेळी आंबेडकर चौकातील दिव्यांश ज्या गटारात पडला त्या गटारावरील झाकण एका व्यक्तीने १ जुलैला सायंकाळी ५.३० च्या सुमारास काढल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे. पाण्याचा झटपट निचरा व्हावा, यासाठी या गटारावरील झाकण काढल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पालिकेच्या हाती लागले. झाकण काढणारी व्यक्ती मात्र त्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे पालिकेने या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

पाण्याचा झटपट निचरा व्हावा, या उद्देशाने गटारावरील काढलेला ढापा पुन्हा लावण्यात आला नव्हता. काही दिवसांनी या गटारावर प्लायवूड टाकून ठेवण्यात आले होते, असे सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणावरून उघड झाले आहे. मात्र, प्लायवूड हटविल्याने ७ ते १० जुलै या कालावधीत गटार उघडेच होते. ढापा कुणी काढला, प्लायवूड कोणी ठेवले, त्यानंतर प्लायवूड कोणी काढले याची चौकशी पालिकेमार्फत सुरू आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून गटारावरील झाकण चोरणाऱ्याचाही शोध घेण्याची मागणी पालिकेने केली आहे.

Last Updated : Jul 15, 2019, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details