मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर झाला. या देश-विदेशातील सीबीएसईच्या शाळांमधून दहावीत ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा निकालात ०.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे ९० आणि ९५ टक्क्यांच्या दरम्यान गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घसरण झाली आहे. या परीक्षेत यंदाही मुलींनीच आपला दबदबा कायम ठेवला आहे.
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - cbsc 10th result
सीबीएसई दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.
देश-विदेशातील २० हजार ३८७ शाळांतील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली हेाती. त्यापैकी १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात सीबीएसईच्या देशातील १६ विभागापैकी त्रिवेंद्रम या विभागाचा ९९.२८ टक्के हा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा गुवाहटी विभागाचा ७९.१२ टक्के इतका आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच आपला दबदबा कायम ठेवला असून देशातील पहिल्या सहा टॉपरमध्ये मुलींचाच समावेश आहे. तर देशात दिल्लीतील हंसिका शुक्ला, मुझफ्फरपुरची करिष्मा अरोरा या दोघी टॉपर ठरल्या आहेत. या दोघींनीही 500 पैकी 499 गुण मिळवले आहेत. तर, दुसरीकडे सरकारी, केंद्रीय विद्यालयांचा निकाल हा सर्वाधिक लागला असताना लाखो रुपयांचे शुल्क आकारणाऱ्या खाजगी शाळांच्या निकालात यंदाही घसरण झाल्याचे समोर आले आहे.
यंदा मुलींचा निकाल ९३.३१ टक्के तर मुलांचा ९०.१४ टक्केक इतका असून मागील वर्षांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी वाढली असल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल ९९.२३ तर त्या खालोखाल जवाहर विद्यालयांचा ९८.६६ आणि सर्वात कमी निकाल हा सरकारी अनुदानितचा ७७.८२ टक्के इतका आहे. सीबीएसईच्या दहावीत यंदा ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या घटली असून यंदा ही संख्या १लाख ८४ हजार ३५८ इतकी आहे. तर ९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण असणारे ४१ हजार ८०४ विद्यार्थी त्यांची टक्केवारीही यंदा घसरून २.२३ इतकी झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३.२५ टक्के इतके होते.