मुंबई- तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त व सध्याचे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश देत प्राथमिक चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार दिल्लीतून आलेल्या सीबीआयच्या पथकाने चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील आणखीन एक तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांना सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलेले होते. तब्बल साडे तीन तास या संदर्भात जयश्री पाटील यांचा जबाब घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रकरण गंभीर - उच्च न्यायालय
जयश्री पाटील यांनी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरून मुंबईतील मलबार हील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला होता. यावर मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे उच्च न्यायालयाने यासंदर्भात कडक ताशेरे ओढले होते. एका गृहमंत्र्यावर सनदी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणे हे खूपच गंभीर असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यानुसार जयश्री पाटील यांचा जबाब घेतला जात आहे.