मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. सीबीआय अधिकारी गेले ११ दिवस सतत याप्रकरणी चौकशी करत आहेत. त्यामुळे ते आता पुन्हा परत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय अधिकाऱ्यांनी क्वारंटाईनमधून सवलत मिळण्यासाठी रितसर मागणी केली होती. त्यांना तशी सवलत देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा सवलत मागण्याची गरज नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. यामुळे यापुढेही सीबीआय पथक मुंबईत राहून चौकशी करू शकते हे स्पष्ट झाले आहे.
अभिनेता सुशांत सिंहचा १४ जूनला मुंबईत त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाला होता. ही हत्या होती की आत्महत्या याचा तपास बिहार पोलिसांकडून केला जात होता. या प्रकरणी चौकशीसाठी आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यानंतर नियमानुसार त्यांना ७ दिवसात पुन्हा बिहारला परत जावे लागले होते. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे.