मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्रातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या संदर्भात सीबीआयने महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे डीजीपी संजय पांडे यांना समन्स बजावले आहे.
दरम्यान, यापूर्वीही सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावल्याची माहिती 30 सप्टेंबर रोजी समोर आली होती. तेव्हाही सीबीआयकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.
सीबीआयकडून स्पष्टीकरण नाही -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. सीबीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना समन्स बजावले जाणार आहेत. यामध्ये दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे जायचे, याबाबतची सविस्तर माहिती असेल.
हेही वाचा -राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना सीबीआयकडून समन्स