मुंबई : सीबीआय या तपास यंत्रणेने आज समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत काही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान सीबीआयने समीर वानखेडे यांचा फोन जप्त करून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. वानखेडे यांच्या वैयक्तिक मोबाइल फोनमधील डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यासाठी करण्यासाठी तज्ञांची एक टीम तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचा देखील मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
काय आहे एफआयआर : सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, समीर वानखेडे यांच्यावर महागड्या घड्याळांची खरेदी आणि विक्री केल्याचा आरोप आहे. त्याचा सोर्स अद्याप समीर वानखेडे यांनी सीबीआयला सांगितलेला नाही. यासोबतच एनसीबीच्या माजी प्रमुखावर विदेश दौऱ्यांदरम्यान झालेल्या खर्चाचा तपशील लपवल्याचा आरोपही आहे. आर्यन खानला अटक करताना क्रूझवर पकडलेल्या काही लोकांना सोडण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. कॉर्डिलिया क्रूज कारवाईनंतर संशयितांना साक्षीदार के. व्ही. गोसावी याच्या वाहनातून आणण्यात आल्याचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.
टोकन मनी म्हणून 50 लाख रुपये घेतले : के. व्ही. गोसावी यांना एनसीबी अधिकारी म्हणून दाखवण्यात आले होते. परंतु के. व्ही. गोसावी आणि त्याचा सहकारी सॅनविले डिसोझा यांनी आर्यन खानच्या कुटुंबाकडून २५ कोटी रुपये उकळण्याचा कट रचला होता. या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि अखेर 18 कोटींचा सौदा पक्का झाला होता. के.व्ही.गोसावी यांनी टोकन मनी म्हणून 50 लाख रुपये घेतले. विशेष म्हणजे, 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खानला 25 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर 2021 ला आर्यनचा जामीन मंजूर केला. एनसीबीने 27 मे 2022 ला आर्यन खानला 'क्लीन चिट' देऊन 14 आरोपींविरुद्ध 6 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
शेवटपर्यंत लढणार : दरम्यान याप्रकरणी समीर वानखेडेशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला होता. सीबीआय कडून गुन्हा दाखल झाल्यानंतर समीन वानखेडे म्हणाले की, ''मी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढणार.'' आर्यन खान ड्रग्जप्रकरणी सीबीआयने सोमवारी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना समन्स बजावले आहे. केंद्रीय तपास एजन्सीने (सीबीआय) एनसीबीच्या मुंबई झोनच्या माजी प्रमुख समीर वानखेडे यांना गुरुवारी 18 मे रोजी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा -