मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या टीमकडून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह, हाऊस किपींग कर्मचारी दीपेश सावंत, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचे चार मित्र, सिद्धार्थ पिठानी याच्यासह सुशांतचा घरमालक संजय लालवाणी यांची चौकशी करण्यात आली आहे. आता सीबीआयने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या वडिलांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, हा दावा रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी फेटाळून लावला आहे. रियाला तसेच कुटुंबीयांना सीबीआयने अद्याप कोणतेही समन्स पाठविले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी बांद्रास्थित सुशांतच्या घरी जाऊन घडलेल्या घटनेचे रिक्रिएशन केले आहे. यावेळी सुशांतच्या घरातील कुक नीरज सिंह, हाऊस किपींग कर्मचारी दीपेश सावंत, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतचे चार मित्र सिद्धार्थ पिठानी हे चौघेही सीबीआयच्या टीमसोबत हजार होते. यानंतर सीबीआयच्या दुसऱ्या पथकाने कूपर रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांची परवानगी घेऊन सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर स्वाक्षरी करणाऱ्या डॉ. सचिन सोनावणे, डॉ. शिवकुमार कोले, डॉ. संदीप इंगळे, डॉ. प्रवीण खंडारे व डॉ. गणेश पाटील यांची चौकशी केली आहे. यानंतर बांद्रा पोलिसांकडून मिळालेले पुरावे, सुशांतसिंहचे ३ मोबाईल फोन, डायरी, कपडे आणि तब्बल ५६ लोकांचे जवाब या सर्व गोष्टी घेतल्यानंतर आता पुढच्या टप्प्यात रिया चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, सीबीआयकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले होते. त्यांच्या या दाव्याचे खंडन रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी केले आहे. आतापर्यंत रिया चक्रवर्ती व कुटुंबाला कुठल्याही प्रकारचे समन्स आले नाही. तसेच चौकशीचे समन्स आल्यास रिया व तिचे कुटुंब चौकशीसाठी हजर होतील, असेदेखील रियाच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. एक जवाबदार व्यक्ती म्हणून रिया व तिचे कुटुंबीय मुंबई पोलीस व ईडीकडे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानुसार सीबीआयच्या चौकशीला ते हजर राहतील, असे सांगण्यात आले आहे.