मुंबईSheena Bora murder case :हायप्रोफाईल शीना बोरा मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत सीबीआयनं साक्षीदारांची यादी कमी करण्याची विनंती न्यायालयाला केलीय. यासाठी सीबीआयनं न्यायालयात 23 नावं दिली होती, जी साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. या प्रकरणात सीबीआयनं एकूण 250 साक्षीदार तपासले असून त्यापैकी 86 जणांची साक्ष पूर्ण झाली आहे.
23 जणांची नावं साक्षीदारांच्या यादीतून वगळा : याबाबत सीबीआयचे तपास अधिकारी रोहित भारद्वाज यांनी गुरुवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लेखी अर्ज सादर केला आहे. या अर्जात त्यांनी 23 जणांची नावं साक्षीदारांच्या यादीतून वगळण्याची विनंती केली. या 23 जणांमध्ये IPS पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.
'या' अधिकाऱ्यांची नावे वगळण्यात येणार :यामध्ये 2012 मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया, शीना बोरा हत्याकांडाचे तपास अधिकारी दिनेश कदम, रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आरडी शिंदे, आयपीएस अधिकारी सत्यनारायण यांच्यासह 23 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. खटला सिद्ध करण्यासाठी या अधिकाऱ्यांची साक्ष आवश्यक नसल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.
सीबीआय विरोधात साक्ष :दुसरीकडं मंगळवारी झालेल्या सुनावणीत आणखी एक मोठी घटना पाहायला मिळाली. सीबीआयच्या दोन साक्षीदारांनी उलटतपासणीत सीबीआय विरोधात साक्ष दिली. सीबीआय अधिकाऱ्यांनी आपल्याला इंद्राणीची ओळख पटवण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. यामुळं स्तब्ध झालेल्या सीबीआयनं त्या साक्षीदारांना विरोधी साक्षीदार म्हणून घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडं केली. न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 जानेवारी निश्चित केली.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण? :इंद्राणी मुखर्जीचं, पीटर मुखर्जीसोबत लग्न झालं होतं. पीटर मुखर्जी यांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. तर खुद्द इंद्राणी मुखर्जीचं 'हे' तिसरं लग्न होतं. 2012 मध्ये पहिल्या पतीपासून जन्मलेली इंद्राणीची मुलगी शीना बोरा हिची हत्या करण्यात आली होती. इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांच्यावर या हत्येचा आरोप आहे. त्यामुळं इंद्राणीला 6 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तिची अंतरिम जामिनावर सुटका केलीय. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सातत्यानं सुरू आहे.
हेही वाचा -
- 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक
- संसदेची सुरक्षा भंग करणाऱ्या चार आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी
- आरक्षणात समानता का नको? मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना सवाल, आंदोलनाची पुढची दिशा 'या' तारखेला ठरणार