महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी नौदलाच्या खलाशानं घेतली लाच, न्यायालयानं ठोठावली पोलीस कोठडी

CBI Arrests Navy Sailor : वैद्यकीय अहवालात फेरफार करण्यासाठी नौदलाच्या खलाशानं लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं त्याला अटक केली होती. या प्रकरणी आरोपी खलाशाला न्यायालयात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

CBI Arrests Navy Sailor
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 10:30 AM IST

मुंबई CBI Arrests Navy Sailor : नौदलाच्या खलाशानं लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्याबाबत मुंबई सत्र न्यायालयामध्ये 20 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. या प्रकरणी न्यायालयानं आरोपीला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. संजू अरलीकट्टी असं सीबीआयनं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

तीस हजार रुपयांची घेतली होती लाच :आरोपी संजू अरलीकट्टी यानं तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून भारतीय नौदल हॉस्पिटल स्टेशन अश्विनी हॉस्पिटल कुलाबा मुंबई या ठिकाणी याबाबत आरोपीला रंगेहात अटक केलेली आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी सीबीआयनं यासंदर्भात ही कारवाई केली होती.

वैद्यकीय तपासणीसाठी मागितली होती लाच :आरोपी संजू अरलीकट्टी यानं एका उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीत फेरफार करण्यासाठी ही लाच मागितली होती. वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याबाबत ही तीस हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सीबीआयकडून जेव्हा आरोपीच्या खोलीची झडती घेतली, त्यावेळी वैद्यकीय अहवाला संबंधित तपासणी करण्यात आलेले कागदपत्र सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहेत.

फोन पे वरुन दिली लाच :सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयामध्ये फोन पे वरुन लाच देणयाची मागणी केल्याचा मुद्दा देखील मांडला. "तीस हजार रुपयांची बेकायदेशीर लाच आरोपी संजू अरलीकट्टी यानं मागितली, फोन नंबरवर फोन पे द्वारे ही रक्कम त्याला द्यावी" अशी मागणी त्यानं केल्याचं सीबीआयच्या वकिलांनी यावेळी स्पष्ट केलं. आरोपीकडून याबाबत मागणी केल्यामुळे आरोपीच्या सूचनेनुसार तक्रारदारानं त्याच्या बँक ऑफ बडोदा मुंबई इथल्या बचत खात्यामधून पाच हजार रुपयांचे फोन पे पेमेंट देखील केलं. परंतु हे पेमेंट पूर्ण झालेलं नव्हतं. यासंबंधी एफआयआरमध्ये देखील तसं नमूद करण्यात आलेलं आहे.

न्यायालयानं ठोठावली 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी :आरोपीला मुंबई सत्र न्यायालयात या खटल्याच्या अनुषंगानं न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी न्यायालयानं आरोपी संजू अरलीकट्टी याला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सत्र न्यायालयाच्या ए सुब्रमण्यम यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. यासंदर्भात ज्येष्ठ वकील विनोद सातपुते यांनी सांगितले की "ही अत्यंत गंभीर बाब आहे. नौदलातील खलाशानं बेकायदा कृती केल्यामुळे त्याची चौकशी नियमानुसार होईलच. त्यामुळेच न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे"

हेही वाचा :

  1. Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओची होणार सीबीआय चौकशी, एफआयआर नोंदवला
  2. CBI Raid: सीबीआयने मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांसह 14 आरोपींविरुद्ध गुन्हा केला दाखल, दोन वेगवेगळ्या प्रकरणात 8 ठिकाणी झाडाझडती

ABOUT THE AUTHOR

...view details