मुंबई - महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात निष्काळजीपणामुळे प्रिन्स राजभर या अडीच महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. याच रुग्णालयात मांजरीने गर्भपात केलेले भ्रूण खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केईएम रुग्णालयात मांजरीने खाल्ले गर्भपात केलेले भ्रूण
केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट झाल्याने आग लागली होती. त्यात उपचार घेणारा अडीच महिन्यांचा प्रिन्स भाजला त्यामुळे त्याचा हातही कापावा लागला. या दुर्घटनेत प्रिन्सचा अखेर मृत्यू झाला. या प्रकरणामुळे पालिकेचे आणि रूग्णालयाचे वाभाडे निघाले आहेत. प्रिन्स प्रकरण ताजे असतानाच केईएम रुग्णालयात बायोवेस्ट कचऱ्यात विल्हेवाट करण्यासाठी टाकलेले गर्भपात केलेले भ्रूण मांजरीने खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
हेही वाचा - तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताहेत याचा आनंदच - छगन भुजबळ
मांजरीने भ्रूणाचे डोके खाल्ल्याचा प्रकार रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही या प्रकरणाची नोंद करून घेतली आहे. गर्भपात केलेले भ्रूण ज्या ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी ठेवले होते, त्या ठिकाणाहून ते बाहेर कसे आले? मांजर त्या ठिकाणी कसे पोहचले? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी रुग्णालय प्रशासनाकडून केली जात आहे.
कंत्राटदाराला नोटीस
झालेल्या प्रकारात कोणाची चूक आहे, याची माहिती केईएम रुग्णालयाकडून मागवण्यात आली आहे. बायोवेस्ट कचऱ्याची विल्हेवाट करणाऱ्या एसएमएस या कंपनीला नोटीस देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सुनील धामणे यांनी दिली.
भिंत बांधण्याची सूचना
बायोवेस्ट विल्हेवाटीसाठी ज्या ठिकाणी ठेवले जाते, त्याच्या बाजूला काही झोपड्या आहेत. या झोपड्यांमधूनच मांजर आली असावी, अशी शक्यता आहे. यामुळे झोपड्या आणि बायोवेस्ट विल्हेवाटी ठेवले जाते त्या जागेमध्ये उंच भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.