मुंबई - कोरोना संक्रमणाच्या दुसरा लाटेमध्ये रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व इतर वैद्यकीय साहित्यांची गरज वाढल्यामुळे ऑनलाइन या साहित्यांचा पुरवठा होत आहे का, यासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असते. मात्र, ऑनलाइन माध्यमातून अशा प्रकारचे साहित्य देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचेही समोर आले आहे. यावरील ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.
हेही वाचा -ऑक्सिजनसाठी बीएमसीने केल्या 'या' उपाययोजना; सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
जेष्ठ सायबर तज्ञ रितेश भाटिया यांच्या म्हणण्यानुसार सध्या व्हॉट्सअॅप, फेसबूक व इतर सोशल माध्यमांवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर सारख्या वस्तू उपलब्ध असल्याच्या लिंक्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमावर तर याचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे गरजू रुग्णांना यातून मदत मिळावी म्हणून कळत नकळत व्हॉट्सअॅप वापर कर्त्यांकडून या बनावट लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोशल माध्यमांवर फिरणाऱ्या या लिंक किंवा संपर्क क्रमांकावर कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्यानंतर त्यांना हवी असलेली औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले जात, मात्र सुरुवातीला 5 हजार ते लाखो रुपयांची रक्कम आगाऊ घेऊन नंतर सदरचे नंबर हे ब्लॉक करण्यात येत असल्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदविण्यात येत आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर औषधांची प्रचंड मागणी वाढलेली आहे. काळ्याबाजारात हे औषध 400 ते 500 टक्के अधिक किमतीने विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांना याबद्दलची माहिती न देता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी सायबर गुन्हेगारांच्या आश्वासनाला बळी पडून पैसे दिले जात आहेत. मात्र, पैसे दिल्यानंतरही औषध न मिळून त्यांची फसवणूक केल्याच्या शेकडो घटना सध्या समोर येत आहेत.
काय करायला हवे?
सायबर तज्ञ रितेश भाटिया यांच्याकडेसुद्धा काही जणांच्या अशा तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्या निदर्शनास असे आलेल आहे की, सुरुवातीला येणाऱ्या फोन कॉल्सवरील व्यक्तीची बोलण्याची भाषा ही फारच उद्धटपणाची असत, कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेऊन त्यांना सुरुवातीला पैसे भरण्यासाठी दबाव टाकला जातो. मात्र, अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या प्रकारचे कॉल्स येत असतील, तर त्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायला हवे.