मुंबई:कांबळीच्या पत्नीने पोलिसात तक्रार केल्यानंतर रविवारी दोन पोलिस कर्मचारी त्यांच्या फ्लॅटवर गेले आणि त्यांना नोटीस बजावली. आरोपीला त्याचे मत मांडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपुढे हजर राहण्यास सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. माहितीप्रमाणे ही घटना शुक्रवारी घडली, असे वांद्रे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. कांबळीची पत्नी अँड्रियाने पोलिस तक्रारीत आरोप केला आहे की, त्याने स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल पत्नीवर फेकून मारले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली.
पत्नीला मारहाण :ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली. कांबळी त्याच्या फ्लॅटवर दारूच्या नशेत पोहोचला. यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाने भांडणात मध्यस्ती केली. पण कांबळी स्वयंपाकघरात गेला आणि तुटलेल्या तव्याचे हँडल आणून पत्नीवर हाणले. त्यामुळे ती जखमी झाली, असे या अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देत सांगितले. कांबळीची पत्नी नंतर वैद्यकीय तपासणीसाठी भाभा रुग्णालयात गेली. तिच्या तक्रारीच्या आधारे वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी कांबळीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार एफआयआर नोंदवला.