मुंबई :एअर इंडिया या विमानामध्ये याआधी सहा प्रवाशावर लघुशंका करणे, मद्यधुंद महिला प्रवाशाकडून कर्मचाऱ्यांना मारहाण यासारखे प्रकार घडले आहेत. आता एका विमानामध्ये एका परदेशी प्रवाशाने धूम्रपान करण्याचा आणि प्रवाशांशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमेरिकन प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमानात धूम्रपान :११ मार्च रोजी एअर इंडियाच्या लंडन ते मुंबई विमानातून एक अमेरिकन नागरिक असलेला प्रवासी प्रवास करत होता. विमानात धुम्रपान करण्यास परवानगी नाही. असे असताना हा प्रवासी बाथरूमध्ये गेला आणि धूम्रपान केले. यामुळे विमानामधील अलार्म वाजायला लागला. प्रवासी आणि क्रू मेंबर बाथरूमच्या दिशेने धावत गेले. तेव्हा त्या प्रवाशाच्या हातात ई सिगरेट आढळून आली. त्याच्या हातातील सिगरेट प्रवाशांनी काढून फेकली. त्यामुळे तो प्रवासी आक्रमक झाला. त्याला कसेतरी समजवून त्याच्या जागेवर बसवण्यात आले.
विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न : या परदेशी प्रवाशाने काही वेळाने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रवासी घाबरले आणि त्याने विमानात नौटंकी करण्यास सुरुवात केली. क्रू मेंबर आणि प्रवासी यांनी या प्रवाशाचे हात पाय बांधून त्याला त्याच्या सीटवर बसवले. विमानात प्रवास करत असलेल्या एका डॉक्टरने त्या प्रवाशाची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत ई सिगरेट आढळून आली. विमान मुंबई विमानतळावर आल्यावर त्या प्रवाशाला एअर इंडियाच्या क्रू मेंबरने सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.