महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Diwali 2023 : मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून, फटाके वाजणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई - Mumbai Police

Diwali 2023 : मुंबईमधील वाढते वायू प्रदूषण (Mumbai Air Pollution) पाहता हायकोर्ट आणि बीएमसीने गेल्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना फक्त दोन तास फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. मात्र रविवार आणि सोमवारी शहरातील बहुतांश भागात या नियमाची पायमल्ली झाल्याचं दिसून आलं. दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Diwali 2023
फटाके वाजणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 10:19 PM IST

मुंबईDiwali 2023 :दिवाळी सणामध्ये फटाक्यांमुळे मुंबई महानगर प्रदेशात वायु प्रदूषण (Mumbai Air Pollution) वाढून हवेची गुणवत्ता खालावली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून जनहित याचिका दाखल करुन घेतली. या याचिकेच्या १० नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं पारीत केलेल्या आदेशामध्ये फटाके वाजवण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. सायंकाळी ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याची मुभा उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली असताना, न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वेळेबाहेर फटाके वाजवणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई : उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची गांभीर्याने दखल घेवून पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली आहे.

४१ अ ची नोटीस दिली: १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७८४ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये ८०६ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ७३४ इसमांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ७३४ जणांकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर भारतीय दंड संविधान १८८, महाराष्ट्र पोलीस कायदा ३३ अन्वये गुन्हा दाखल करून ४१ अ ची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई रात्री १० नंतर ते सकाळी ६ पर्यंतच्या काळात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ७२ जणांवर दिवसा फटाके उडवल्याप्रकरणी भारतीय दंड संविधान १८८ अन्वये गुन्हा दाखल करून ४० अ ची नोटीस देण्यात आली. तसेच सदरची कारवाई ही यापुढे देखील सुरु रहाणार असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे.



तीन दिवसात ७८४ गुन्हे दाखल : उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याची वेळ रात्री ८ ते १० अशी निश्चित केलेली असतानाही, मुंबईत धनत्रयोदशीच्या दिवशी, तसेच शनिवारीही या मर्यादेच्या व्यतिरिक्त फटाकेबाजी करण्यात आली. काही ठिकाणी रात्री १२ नंतरही फटाके फुटत होते. पोलिसांची वाहने संध्याकाळी मुंबईच्या विविध भागांमधून फिरताना नागरिकांनी पाहिली. तरीही फटाक्यांसाठी निश्चित केलेल्या वेळेपलीकडे फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई करत मुंबईत गेल्या तीन दिवसात ७८४ गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा -

  1. Fire incidents on Laxmi Pujan: दिवाळीच्या दिवशी मुंबईत तीन ठिकाणी आगीच्या घटना, फटाके ठरले आगीचे कारण
  2. Pollution Contro : मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणा बाबत किती गंभीर?, विरोधकांचा सवाल
  3. Diwali 2023 : दिवाळीत फटाके फोडण्याची वेळ दोन तासांवर, पहाटे फटाके वाजवायचेच नाही - उच्च न्यायालय

ABOUT THE AUTHOR

...view details